Ladki Bahin Yojana September Hapta : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दिवाळीपूर्वीच राज्य सरकार देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. या योजनेत ई-केवायसी (Ladki Bahin Yojana eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे आणि नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर, सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी (e-KYC) अभावी थांबवणार का, याविषयीची चर्चा सध्या सुरू आहे.
सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता थांबणार का?
लाडकी बहीण योजनेच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्यासाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असल्याचा कोणताही अधिकृत शासन निर्णय सरकारने जाहीर केलेला नाही. त्यामुळे सध्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ई-केवायसी अभावी थांबवण्यात येईल, असा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. सप्टेंबर महिन्याच्या हप्त्यासंदर्भात अजून शासन निर्णय आलेला नाही. सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर हा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतो.
पुढील हप्त्यांसाठी e-KYC महत्त्वाचे
सध्या e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दीड महिन्यांचा कालावधी आहे. नोव्हेंबरपूर्वी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. जर नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसी केली नाही, तर नोव्हेंबरचा हप्ता आणि त्यापुढील हप्ते ई-केवायसी अभावी थांबवले जाऊ शकतात. ई-केवायसी करताना पोर्टलमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येत असल्या तरी, पुढील हप्ते सुरळीत सुरू ठेवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण करावी?
ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स वापरा:
- पोर्टलला भेट द्या: लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्या.
- पर्याय निवडा: लॉगिन केल्यावर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आधार क्रमांक नोंदवा: तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) आणि कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.
- ओटीपी (OTP) व्हेरिफिकेशन: आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी देऊन ‘Send OTP’ या पर्यायावर क्लिक करा. आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP नमूद करा आणि Submit करा.
- नवीन नियमानुसार माहिती भरा: आता पती, वडिलांचा आधार कार्ड क्रमांक, कॅप्चा कोड आणि OTP नमूद करा.
- जात प्रवर्ग आणि घोषणापत्र: लाभार्थी लाडक्या बहिणीचा जात प्रवर्ग निवडा आणि आवश्यक प्रमाणित घोषणापत्रावर (Declaration) क्लिक करा.
- अंतिम सबमिट: संपूर्ण माहिती वाचून Submit बटण क्लिक करा. e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश स्क्रीनवर दिसेल.
